वृत्तपत्रीय निवेदन
अभियंता दिनानिमित महानिर्मितीचे अभियंते सन्मानित
तांत्रिक पेपर्स सादरीकरणात महिला अभियंत्यांची सरशी
“महानिर्मिती अभियंत्यांनी कार्यक्षमता वृद्धी आणि सातत्य हा मूलमंत्र अंगीकारावा” - डॉ. पी. अन् बलगन
(मुंबई, दि. २०/०९/२०२४) : काळ बदलल्याने त्यानुसार विचारात बदल स्वीकारावा लागतो आणि वीज क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीत कार्यक्षमता वाढ, कामाबाबत समर्पण आणि सातत्य ठेवावे लागेल तरच स्पर्धेत टिकून राहता येईल. ज्या संस्थेत आपण काम करतो, त्या संस्थेला पुढे नेण्याचा ध्यास ठेवून प्रत्येकाने योगदान वाढविणे गरजेचे असल्याचे डॉ. पी. अनबलगन यांनी अभियंत्यांना संबोधित केले, ते महानिर्मितीतर्फे आयोजित अभियंता दिनी सांघिक कार्यालय, प्रकाशगड मुख्यालयात बोलत होते. अभियंता दिनानिमित्त राज्यस्तरीय तांत्रिक पेपर्स सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता संवर्गातील सुमारे २०० अभियंते यामध्ये सहभागी झाले, त्यामधून ३० पेपर्सची प्राथमिक निवड करण्यात आली व त्यातून सर्वोत्तम १० तांत्रिक पेपर्सला सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन, संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक (संचलन) संजय मारुडकर, संचालक (प्रकल्प) अभय हरणे, संचालक (इंधन) डॉ. धनंजय सावळकर, कार्यकारी संचालक (संचलन व सुव्यवस्था-१) राजेश पाटील प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
“पैसा बचत म्हणजेच पैसा निर्माण, याची जाणीव ठेवा” - बाळासाहेब थिटे
महानिर्मितीच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आर्थिक जाणीवा जागृती पोहोचणे काळाची गरज बनली आहे, खर्चात काटकसर, बचत केल्याने महानिर्मितीच्या अवांतर खर्चात लक्षणीय घट झाली. त्याचे मूळ कारण आर्थिक शिस्त असून महानिर्मितीच्या पैशाची बचत म्हणजेच पैश्याचे निर्माण, याची जाणीव प्रत्येक अभियंत्याने ठेवून काम करावे, असे बाळासाहेब थिटे यांनी सांगितले.
“आपली स्पर्धा आपल्या सोबतच आहे, ही भावना मनात ठेवून आगामी १० वर्षांचे नियोजन करा” - संजय मारुडकर
आगामी वर्षांसाठी महत्तम वीज उत्पादनाचे व्यवस्थापनाने लक्ष्य निर्धारित करून दिलेले आहे. त्यासाठी प्रयत्न करताना चतुरस्त्र वाचन, बाजाराचा अभ्यास, स्पर्धेतील आगामी आव्हाने, उत्तम संवाद तथा अद्ययावत माहिती ठेवावी लागणार आहे. छोट्या छोट्या योगदानातून महानिर्मितीचा सर्वांगीण विकास साधण्याची ही खरी वेळ असून आगामी दहा वर्षांचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत संजय मारुडकर यांनी व्यक्त केले.
“स्पेशलायझेशन युगात स्मार्ट राहावे लागणार” - अभय हरणे
नवीन संकटे, आव्हाने, विज्ञानाची कास धरून उपलब्ध संधीचे सोने करता आले पाहिजे. कौशल्य, तंत्रज्ञान, कार्यसंस्कृती सोबतच कार्यक्षम झाले पाहिजे. आगामी काळात महानिर्मिती वीज क्षेत्रातील नामांकित संस्थांसमवेत सामंजस्य करार, जे.व्ही करणार असून नवीकरणीय क्षेत्रात दमदार पाऊल टाकत असून वाढीव क्षमतेसोबतच महसूल वाढीच्या विविध स्त्रोतांचे नियोजन करण्यात आले असल्याचे अभय हरणे यांनी सांगितले.
“प्रामाणिक काम, हीच राष्ट्रभक्ती” - डॉ. धनंजय सावळकर
मागील दीड वर्षाच्या कालखंडात १२०० उमेदवारांची भरती, १६०० व्यक्तींची बढती, १०४० पदांचे पुनर्विलोकन, कामगार वेतनवाढ केली आहे. लवकरच फेस ओळख बायोमेट्रिक प्रणाली आणि वरच्या पदाचा ग्रेड मिळण्याची प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ह्या वर्षी महानिर्मितीकडे २१ लाख मेट्रिक टन इतका कोळसा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वीज उत्पादनासाठी कोळशाची चिंता नाही. आपले काम प्रामाणिकपणे करणे हीच राष्ट्रभक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
पुस्तक प्रकाशन
३० तांत्रिक पेपर्सवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
झपाट्याने बदलत्या वीज क्षेत्रात आज अनेक आव्हाने आहेत, त्यामुळे मलखांबात ज्याप्रमाणे टोकापर्यंत गेल्यानंतर खाली घसरायला होते, त्याचप्रमाणे वीज उत्पादन क्षेत्रात कायम शिखर उत्पादन करण्यासाठी महानिर्मितीच्या अभियंत्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे प्रारंभी प्रास्ताविकातून राजेश पाटील यांनी भूमिका मांडली.
यानंतर सर्वोत्तम तांत्रिक पेपर सादरीकरणाबाबत चित्रा पाटील, उप कार्यकारी अभियंता, भुसावळ आणि जयश्री नंदनवार, उप कार्यकारी अभियंता, खापरखेडा यांनी तांत्रिक पेपर्स सादरीकरणावर आपली अभ्यासपूर्ण भूमिका मांडून उपस्थितांची वाहवा मिळवली व हे यश आमचे वैयक्तिक नसून सांघिक प्रयत्नांचा परिपाक असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
पिनॅकल पारितोषिक (एप्रिल २०२४) सर्वोत्कृष्ट औष्णिक विद्युत केंद्र म्हणून खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला गौरविण्यात आले. तसेच अखंडित २८६ दिवस वीज उत्पादनासाठी संच क्र. ४, पारस औष्णिक विद्युत केंद्र, अखंडित ११३ दिवस वीज उत्पादनासाठी संच क्र. १, खापरखेडा औ.वि. केंद्र, अखंडित १०९ दिवस वीज उत्पादनासाठी संच क्र. ८, चंद्रपूर महाऔ.वि. केंद्राला तर अखंडित १०८ दिवस वीज उत्पादनासाठी संच क्र. ६, परळी औ.वि. केंद्राला सन्मानित करण्यात आले. तसेच मे २०२४ या महिन्यातील पिनॅकल पारितोषिक अखंडित १०२ दिवस वीज उत्पादनासाठी उरण बी.ओ. तर अखंडित १०८ दिवस वीज उत्पादनासाठी खापरखेडा औ.वि. केंद्राला सन्मानित करण्यात आले. पिनॅकल पारितोषिक विद्युत केंद्राच्या शिफ्ट प्रमुखांना वैयक्तिक पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले, हे विशेष.
तसेच सर्वोत्कृष्ट कामगिरी पारितोषिकाचे मानकरी म्हणून सुनिल सोनपेठकर, मुख्य अभियंता, सुनिल दंडवते, कार्यकारी अभियंता, रेणुकादास कुळकर्णी, कार्यकारी अभियंता, शैलेंद्र पडवी, उप कार्यकारी अभियंता, सौरभ कुळकर्णी, उप कार्यकारी अभियंता, महेश जोशी, उप कार्यकारी अभियंता, समीर देऊळकर, उप महाव्यवस्थापक (मानव संसाधन), योगेंद्र पाटील, उप महाव्यवस्थापक (मानव संसाधन) यांना सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सोनाली पगारे, वैष्णवी वंजाळकर, रोशन दुधे तर आभार प्रदर्शन मुख्य अभियंता (प्रशिक्षण) सुनिल सोनपेठकर यांनी केले.
याप्रसंगी कार्यकारी संचालक विवेक रोकडे, डॉ. नितीन वाघ, पंकज नागदेवते, नितीन चांदूरकर, मुख्य अभियंते डॉ. अनिल काठोये, प्रसन्न कोटेचा, संजय रहाटे, दत्तात्रय साळुंखे, राहुल नाळे, शैलेश पडोळ, विजय बारंगे, अतुल सोनजे, राहुल सोहनी,श्रीमती. विजया बोरकर, मुख्य महाव्यवस्थापक आनंद कोंत, विश्वनाथ कुळकर्णी, हर्षल भास्करे, राजीव मालेवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजुरकर, कंपनी सचिव राहुल दुबे, उपमुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, अन्य वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच महानिर्मितीचे विविध विद्युत केंद्रातील अधिकारी-कर्मचारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.