+A A -A
screen-reader



/

- वृत्तपत्रीय निवेदन -

राधाकृष्णन बी. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक

 

(मुंबई, दि. २६ डिसेंबर २०२४) - राधाकृष्णन बी. हे भारतीय प्रशासनिक सेवेतील २००८ तुकडीतील महाराष्ट्र संवर्ग अधिकारी असून नुकतेच त्यांनी ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य अशा महानिर्मितीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार दिनांक २६ डिसेंबर रोजी डॉ. पी. अन् बलगन (भा.प्र.से.) यांचेकडून स्वीकारला आहे.

त्यांनी बॅचलर ऑफ सायन्स (कृषी) आणि मास्टर ऑफ सायन्स (मायक्रोबायोलॉजी) या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना सुमारे १६ वर्षांचा प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात सहसचिव, आयुक्त मनपा नागपूर, मुंबई म्हाडा बोर्डाचे मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी नाशिक, रत्नागिरी, उप विभागीय अधिकारी नंदुरबार, अहमदनगर, महाराष्ट्र समुद्री बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जालना जिल्हा परिषद, मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी म्हणून आपल्या प्रशासकीय कार्याचा ठसा उमटवित प्रशासकीय सेवेतील उत्तम अधिकारी म्हणून नावलौकिक कमावला आहे.

अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या हार्वर्ड फूल ब्राईट स्कॉलर साठी त्यांची भारतातर्फे निवड होऊन हार्वर्ड विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासन या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून नुकतेच ते भारतात परतले आहेत. अमेरिका, व्हिएतनाम तसेच सिंगापूर येथे प्रशासकीय प्रशिक्षण, सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे सागरी किनारपट्टी संरक्षण पद्धती तसेच ऑस्लो, नॉर्वे येथे नौवहन परिषदमध्ये सहभाग नोंदवला आहे. सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन आणि आर्थिक जबाबदारीचे त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले आहे.

त्यांना सन २०१५ मध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मॅरेथॉन, सायकलिंग, गिर्यारोहण, क्रिकेट, फुटबॉल या क्रीडा प्रकारात त्यांना विशेष आवड आहे.

विजेच्या मागणीनुसार महानिर्मितीचे किफायतशीर दरात वीज उत्पादन अखंडित ठेवणे तसेच औष्णिक कडून हरित ऊर्जेकडे वाटचालीला गती देणे आणि प्रस्तावित महत्वाकांक्षी वीज प्रकल्पांना गती देणे हे प्राधान्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

Scroll