+A A -A screen-reader



/

-: वृत्तपत्रीय टिप्पणी :-

१०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महानिर्मितीने पटकावला राज्यात दुसरा क्रमांक

 

(मुंबई, दि. १६ मे २०२५) - मा. मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राज्य शासनाच्या "१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम" अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लिमिटेड (महानिर्मिती) ने उल्लेखनीय यश मिळवत राज्यातील सहभागी एकूण ९५ आस्थापनांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात महानिर्मितीने आपल्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा करत सार्वजनिक उपक्रमांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

या कार्यक्रमात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवा विषयक गुणवत्तेचे निकष गृहीत धरून क्वालिटी काउंसिल ऑफ इंडियाकडून मूल्यांकन करण्यात आले. महानिर्मितीने या सर्व निकषांमध्ये भरीव कामगिरी करीत आपल्या कार्यपद्धतीतील सुधारणा, वेगवान निर्णयप्रक्रिया, आणि उत्पादन क्षमतेत वाढ साधली. विशेषतः महानिर्मितीतर्फे ऊर्जानिर्मितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि कार्यालयीन सुसज्जता व पर्यावरणपूरक उपाययोजना यांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.

महानिर्मितीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांनी या यशाबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, "ही कामगिरी केवळ पुरस्कारासाठी नव्हे तर जनतेसाठी अधिक चांगल्या सेवा पुरविण्याच्या दृष्टीने कटिबद्धतेचे प्रतिक आहे," असे ते म्हणाले. या पुरस्कारातून प्रेरणा घेत अधिक कार्यक्षमतेने राज्यातील वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन त्यांनी केले.  या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा अभिनव मोहिमेबद्दल राधाकृष्णन बी. यांनी शासनाचे विशेष आभार मानले.

महानिर्मितीचे संचालक (वित्त) श्री. बाळासाहेब थिटे, संचालक (संचलन) श्री. संजय मारूडकर आणि संचालक (प्रकल्प) श्री. अभय हरणे यांनी या सांघिक यशाबद्दल सर्व कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व अभियंता आणि कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले.

राज्य सरकारनेही या उल्लेखनीय यशाची दखल घेत महानिर्मितीच्या कार्यसंस्कृतीचे कौतुक केले आहे. हे यश इतर सार्वजनिक उपक्रमांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे.

💬 Chat with us
Scroll