+A A -A
screen-reader



/

महानिर्मिती सरत्या वर्षातील घडामोडी
 
नैसर्गिक संसाधनांचा महत्तम वापर करून, नवीकरणीय ऊर्जेच्या नवनवीन संधी शोधत सन २०३० पर्यंत २५ गिगावाट पेक्षा अधिक स्थापित क्षमतेचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याने महानिर्मितीने सन २०२३ मध्ये अनेक महत्वपूर्ण करार करून दमदार प्रारंभ केला आहे.
 
वर्षभरात विविध संवर्गात १ हजार पेक्षा जास्त व्यक्तींना कायमस्वरूपी रोजगार देऊन राज्य शासनाच्या "महासंकल्प रोजगार अभियानात" उल्लेखनीय योगदान दिले. 
 
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी या उद्देशाने वर्षभरात १८.१६ मेगावाट स्थापित क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले. त्यात नागेवाडी ४.२ मेगावाट, वाळेखिंडी ३.३६ मेगावाट, बोर्गी २ मेगावाट, कुंभोज ४.४ मेगावाट, सोनगांव ४.२ मेगावाटचा समावेश आहे.  सुमारे ६६२ मेगावाट स्थापित क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. महानिर्मिती अंतर्गत नवीकरनीय प्रकल्पांसाठी "महानिर्मिती नवीकरणीय ऊर्जा मर्यादित" कंपनीची स्थापना केली.
 
महानिर्मितीने २३ संचांकरिता ५२२९ कोटी गुंतवणूक करून फ्ल्यू गॅस डी सल्फारायझेशन युनिट (एफ.जी.डी) लावण्यास सुरुवात केली. पर्यावरणपूरक दृष्टीने महानिर्मितीचा हा मोठा निर्णय आहे. कोराडी-खापरखेडा आणि चंद्रपूर वीज केंद्रातील राखेचा विनियोग वाढावा यासाठी "स्वारस्य अभिरुची सूचना"(EOI) प्रसिद्ध करण्यात आली.
 
कोळसा खाणीतून थेट कोराडी-खापरखेडा वीज केंद्रात पाईप कन्व्हेयरद्वारे कोळसा वहन प्रणाली कार्यान्वित झाली. यावर्षी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल वातावरणामुळे विजेची मागणी २९ हजार मेगावाटच्या घरात पोहचली असता उत्तम कोळसा व्यवस्थापन तसेच संयंत्रांची देखभाल दुरुस्ती निर्धारित वेळेत करून अखंडित वीज उत्पादन राखण्यात यश मिळवले.  
 
महानिर्मितीच्या भुसावळ ६६० मेगावाट क्षमतेच्या वीज संचाचे बाष्पक प्रदीपन आणि टर्बाईन रोलिंग करण्यात आले तर कोराडी येथे ६६० मेगावाट क्षमतेचे दोन बदली संच उभारण्यास राज्य शासनाने तत्वत: मंजुरी आणि आर्थिक तरतूद केली आहे.
 
महानिर्मितीने अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात ५२२० मेगावाट क्षमतेच्या उदंचन(पंप स्टोअरेज) सौर-पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी मेसर्स एस.जे.व्ही.एन., महाऊर्जा आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे समवेत सामंजस्य करार केले. यात ४० हजार ९९० कोटींची गुंतवणूक तसेच ६ हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.
 
केंद्र शासनाच्या ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत भुसावळ येथे ग्रीन हायड्रोजन प्रकल्प प्रगतीपथावर आहे तर ४५ दशलक्ष घनमीटर सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प चंद्रपूर येथील रहमतनगर आणि पठाणपुरा येथे कार्यान्वित करून प्रक्रिया केलेले पाणी चंद्रपूर वीज केंद्रात वापरण्यात येणार आहे.
 
“मिशन समर्थ” अंतर्गत “जैव इंधन” (पेलेटस)विषयक राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात पुढाकार घेतला आणि जनजागृती केली. 
 
६ मार्च २०२३ रोजी महानिर्मितीचे औष्णिक विद्युत उत्पादन ८००० मेगावाट पेक्षा अधिक होते. कोराडी २१० मेगावाट संच ६ मधून ५.२१ दशलक्ष युनिट प्रतिदिन वीज उत्पादनाचा ऐतिहासिक उच्चांक. सलग १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस वीज संच चालविण्यात यश आले त्यात नाशिक संच ४, पारस संच ४, चंद्रपूर संच ३,भुसावळ संच ३ व ५ यांचा समावेश आहे. शिखर मागणी काळात घाटघर संच विक्रमी वेळेत कार्यान्वित करण्यात आला. एकूणच विजेच्या मागणीनुसार महत्तम वीज उत्पादन कायम राखण्यात महानिर्मितीच्या मनुष्यबळाने आपले तांत्रिक कौशल्य पणाला लावले. आर्थिक शिस्त, काटकसर करून आर्थिक व्यवस्थापन करण्यात आले. सर्वोत्तम  कामगिरीबाबत महानिर्मितीच्या वीज केंद्रांना राष्ट्रीय-राज्य स्तरावर सन्मानित करण्यात आले.
 
संचालक म्हणून संजय मारुडकर, अभय हरणे, कार्यकारी संचालक म्हणून राजेश पाटील आणि डॉ. धनंजय सावळकर रुजू झाले तर पहिल्या महिला मुख्य अभियंता म्हणून विजया बोरकर रुजू झाल्या. 
 
कोविड संक्रमण कालावधीत मृत्युमुखी पडलेल्या ३२ वीज योद्ध्यांच्या स्मरणार्थ चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने "निर्भय शिल्प” साकारून अवलंबितांना १४.२ कोटींचे धनादेश दिले.
 
महानिर्मितीच्या राज्यभरातील वीज केंद्र, प्रकल्प आणि कार्यालयात रक्तदान शिबिरे आयोजित करून सुमारे २ हजार रक्तपिशव्या संकलित करून गरीब गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून महानिर्मितीने सामाजिक जाणिवा जोपासल्या.
 
कोराडी, चंद्रपूर येथे हॅप्पी स्ट्रीट (मामाचं गांव/आमचं गाव) उपक्रम लोक उत्सव ठरला. संघटना सहभागातून विकास कार्यशाळा,
राष्ट्रीय गुणवत्ता मंडळ स्पर्धेत भुसावळ-पारस औष्णिक विद्युत केंद्राची उत्कृष्ट कामगिरी. नाट्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, अर्थ विषयक, प्रबोधनपर  आणि मनोरंजनपर कार्यक्रमातून महानिर्मितीने मनुष्यबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या  कला कौशल्याला संधी उपलब्ध करून आनंदाचा स्तर उंचावला.

Scroll