महानिर्मिती मीडिया नोट
९ जानेवारी २०२४
खापरखेडा वीज केंद्राच्या ३४ व्या वर्धापन दिनाची शानदार सांगता
नववर्षात ९० टक्के भारांकासह १२०० मेगावाटचा संकल्प
हॅप्पी स्ट्रीटमध्ये ३ हजार नागरिकांचा सहभाग
४३० रक्तपिशव्या रक्तदान करून सामाजिक बांधिलकी
हॅप्पी स्ट्रीट(आमचं गांव) आणि कंत्राटी कामगारांसाठी क्रिकेट सामने विशेष आकर्षण ठरले
आनंद मेळावा, क्रीडा, सांस्कृतिक व मनोरंजनातून उत्साहपूर्ण वातावरण
खापरखेडा ९ जानेवारी २०२४ : स्व- ऊर्जेने यावर्षीचा खापरखेडा वर्धापन सोहळा सर्वोत्तम झाला आहे आणि हाच उत्साह वर्षभर कायम ठेवून कुटुंबाची प्रगती आणि पर्यायाने महत्तम वीज उत्पादनाचा उच्चांक गाठावा असे प्रतिपादन महानिर्मितीचे संचालक(संचलन) संजय मारुडकर यांनी केले. ते खापरखेडा येथे ३४ व्या वर्धापन दिन समारोपीय समारंभात प्रकाशनगर वसाहत येथे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (संचलन) संजय मारुडकर होते तर मंचावर विशेष अतिथी म्हणून कार्यकारी संचालक पंकज सपाटे, मुख्य अभियंते विलास मोटघरे, नारायण राठोड, उप मुख्य अभियंते प्रवीण रोकडे, सुदीप राणे, विराज चौधरी,जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, वर्धापन सचिव राहुल बागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय मारुडकर म्हणाले की, खापरखेडा वीज केंद्राचा वैभवशाली इतिहास बघता आगामी काळात १०० टक्के भारांक अपेक्षित आहे. त्यांनी नफातोट्याचे गणित अतिशय सुलभरीत्या मांडले.अवांतर खर्च कमी करून तफावत भरून काढावी. वीज उत्पादनासोबतच सुंदर स्वच्छ परिसर, सामाजिक जबाबदारी, प्रदूषण कमी करणे राख उपयोगिता वाढविणे, व्यवस्थापकीय संचालकांची त्रिसुत्री इत्यादी बाबीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. उत्तम कामगिरीबाबत सर्वांचे अभिनंदन केले. खापरखेडा येथे अनुभवी कुशल मनुष्यबळ आहे आता विजय राठोड यांच्या रुपात उत्तम नेतृत्व लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.
पंकज सपाटे यांनी मागील तीन महिन्यातील उत्तम कामगिरीबाबत सुदीप राणे आणि जितेंद्र टेंभरे यांच्या टीम २१० आणि टीम ५०० मेगावाटचे मनापासून अभिनंदन केले. तसेच संघटना प्रतिनिधींच्या सहभागातून अधिकची मदत झाल्याचे सांगितले. प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न करा "यश तुमचे अपयश आमचे" अशापद्धतीचे प्रेरणादायी विचार मांडले.
अध्यक्षस्थानाहून बोलतांना मुख्य अभियंता विजय राठोड म्हणाले कि,
वर्धापन समारंभ साजरा होत असताना 'क' पाळीत काम करणाऱ्या मनुष्यबळाच्या त्यागाचे त्यांनी अभिनंदन केले. खापरखेडा टीम सर्वोत्तम आहे, आम्ही नववर्षात ९० टक्के भारांक आणि १२०० मेगावाट वीज उत्पादनाचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यालयाच्या मार्गदर्शनामुळे उत्तम कामगिरी शक्य झाले आणि आता हा उत्साह महत्तम वीज उत्पादनात परिवर्तीत करून दाखवू अशी ग्वाही दिली.
प्रारंभी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन तसेच संचालक व इतर मान्यवरांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त क्रिकेट, बॅडमिंटन,टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, कॅरम, गंमतीशीर खेळ, रस्साखेच, मॅरेथॉन, बुद्धिबळ, रांगोळी, चित्रकला, परिसर स्वच्छता, हैप्पी स्ट्रीट (आमचं गाव) आनंद मेळावा, प्रदर्शनी, महिला मंडळ कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक राजेश दुरुगकर, इशा रानडे, श्रुती चौधरी, शिवानी जोशी या गायकांनी स्वरमधुरा सदाबहार हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
या प्रसंगी अधीक्षक अभियंते संजय तायडे, संजीवकुमार पखान, विश्वास सोमकुंवर, शिरीष वितोंडे, विलासकुमार उके,प्रशांत साखरकर, वैद्यकीय अधीक्षक मुकेश गजभिये, विभाग प्रमुख, वर्धापन दिन आयोजन समिती पदाधिकारी-सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभाचे सूत्र संचालन आनंद वाघमारे, संदेश वाचन हर्षवर्धन नागरगोजे, प्रास्ताविक राहुल बागडे तर उपस्थितांचे आभार नितीश पडोळे यांनी मानले. ३४ वा वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती,अधिकारी, विभाग प्रमुख, अभियंते,तंत्रज्ञ,कर्मचारी, कंत्राटी कामगार, संघटना प्रतिनिधी, कुटुंबीय, कंत्राटदार, पुरवठादार इत्यादींचे सहकार्य लाभले.
विशेष सन्मान –
महानिर्मितीच्या ५० लक्ष किमतीचे साहित्य चोरीला जाण्यापासून वाचविल्याबद्दल नवीन सतीवाले वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा), सचिन पवार उपव्यवस्थापक (सुरक्षा), दीपक सोनवणे कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, साहेबराव लकडकर कंत्राटी सुरक्षा रक्षक यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
कर्तव्यावर असताना समयसुचकतेमुळे वॅगन अनलोडिंग करताना दोन अज्ञात व्यक्तींचे प्राण वाचविल्याबद्दल संजीवकुमार गर्जे तंत्रज्ञ-१ यांना सन्मानित करण्यात आले.
प्रकाश हेडाऊ, सहाय्यक अग्निशमन अधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
महानिर्मिती नाट्यस्पर्धेत “नथिंग टू से” नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल नाट्य कलावंतांना सन्मानित करण्यात आले.
फोटो ओळ - संजय मारुडकर मार्गदर्शन करताना, मंचावर इतर मान्यवर.